धान

बटाटे आणि भुईमुग झाल्यावर ह्या पावसाळ्यात भात लावायचा बेत केला. मुळशी भागात प्रचलित असलेला इंद्रायणी आणि हौस म्हणुन बासमती.
दोन खाचरात टोकण पध्दतीने इंद्रायणी लावला. या पद्धतीत भाताची थेट पेरणी होते. परत चिखल करुन लावणी करावी लागत नाही. भात थोडा कमी येतो पण लेबर कमी लागते.
बासमती पारंपारिक पद्धतीने लावला आणि बसलो पावसाची वाट बघत. आधी पठ्या आलाच नाही, मग खाचरं भरेपर्यंत बरसला नाही. मग एकदाचा आला. मग लावणीची धावपळ!मग मात्र खाचरं हिरवीगार दिसु लागली.

जसजशी सावन-भादोचा उन पावसाचा खेळ सुरु झाला, तसं भात निसु लागलं ओंब्यांवर आलं. बासमती आधी झाला आणि इंद्रायणी नंतर.

आता भात कापायला झालाय तर परतीच्या पावसाने परत खेळ मांडलाय, पठ्या संपायलाच तयार नाही! खाचरात उभं पीक झोपायला लागेल.
असं असतं नाही शेतक-याचं, सगळं निसर्गावर अवलंबुन!

Posted in cultivation | Leave a comment

केळीचे फुलले बाग

जवळ जवळ वर्षापुर्वी राईवर केळ्याचे कंद आणुन लावले होते. दिसामासानं केळी मोठ्या होत होत्या.

आता वर्षभराने आम्ही केळ्याच्या घडांची वाट बघायला लागलो होतो. गेल्या एक – दोन आठवड्यात अचानक अभयला शोध लागला की सगळ्यात मोठ्या केळीला घड पडला. दिसामासाने तो घड मोठा होतोय. ह्या आठवड्यात दुस-या केळीला ही घड पडलाय.

आम्हाला आता “शिकरण पोळीच्या” मेजवानीची स्वप्न पडायला लागलीत!

Posted in cultivation | Leave a comment

खंडु बटाटे…

जसजशी राई फळुफुलु लागली तशी आमच्या घराला, वाहनाला शेतकी कळा येउ लागली. गाडीची डिकी उघडली तर त्यात काय सापडेल याचा नेम राहिला नाही. कधी गमबुट, कुदळ फावडे, तर कधी ठिय्या देउन बसलेला टमटमीत चिकाळ फणस. गावाकडची मंडळी नुकतीच गाडीत बसुन गेली असली तर गाडीत अस्सल गावाचा शेणा-खताचा – तांबड्या मातीचा वास परमळतो.

डिसेंबरमध्ये खालच्या जमिनीत खाचरं तयार करुन घेतली आणि बोअर मारली. आणि अगदी खालच्या दोन वावरात बटाटा पेरला. पंप बंद पडणे, वीज बेभरवश्याची असणे हे नेहमीचे घटक होतेच. दुसरे एक ठरवले की शक्यतो जैविक शेती करायची. रसायनांचा उपयोग करायचा नाही. बटाट्याची रोपे तरारली. मुळाला बाळ बटाटे लागले. – हो आमची बाग माकडाची असल्याने आम्ही हळुच खणुन पण पाह्यले. :) ३ एक महिन्यात रोपं सुकायला लागली. हे बटाटे तयार झाल्याचे लक्षण. २१ मार्च ला काढणी केली. अभय ९ पोती – अंदाजे ३५० कि. बटाटे गाडीत भरुन घेउन आला.

.. आणि तेंव्हा पासुन आमचे “खंडु बटाटे” झाले आहेत. आईकडे एका खोलीभर बटाटे पसरले आहेत. तिथे बटाट्यांची घाउक देवाण घेवाण होते. बटाटे न्याहाळुन ते कशे गोरे गोमटे, गुळगुळीत, पातळ सालीचे मोठे आहेत ह्याची आम्ही कौतिकं करत असतो. अधुन मधुन जाउन बघुन अजुन आहेत ह्याची खात्री करुन घेतो :) त्यातले काही खराब वाटले तर हळहळतो. आमच्या शेतातल्या बटाटा खाल्याने वार्धक्य सोडुन इतर सर्व व्याधी दुर होतात असे छातीठोक प्रतिपादन करतो. आमच्या बटाट्यांबद्दल उणा तर जाउच द्या शंकावाचक उद्गार ही आम्ही खपवुन घेत नाही! लगेच एल्गार पुकारतो. एकदम वेपन्स अ‍ॅट डॉन!
तिथेच पिशव्या भरुन बटाटे नातेवाईक, ओळखीचे, शेजारचे यांना नेउन दिले. बाहेर गावच्या नातेवाईकांना एस्टीत चढवुन पाठवले. अभयने एक पोते ऑफिसला नेले. आणि पिशवी आणा – बटाटे न्या या तत्वावर वाटले. चिनीची परिक्षा आहे म्हणुन नाहीतर तिला दारात एक टेबल आणि वजन काटा टाकुन द्यायचा विचार होता. कधी नव्हे तो तिला मग अभ्यासाचा पुळका आला.

तर दुसरीकडे स्वैपाकघरात बटाटा महोत्सव सुरु झाला. आधी फ्रेंच फाईस झाले. मग भाज्या, रस्से, कोशींबीर, पराठे झाले. सद्ध्या घरात पोहे ही बटाटा पोहे होतात. मग वाळवणे सुरु झाली. कीस झाला. वेफर्स झाले. आता कलकत्ता, आसनसोल आणि टिंबक्टु येथिल नातेवाईकांना बटाटे न पाठवता आल्याने कीस कुरियर ची व्यवस्था करण्यात आली. वेफर्स ची किसणी जाड झाल्याने परत एकदा पातळ वेफर्स चा घाट घातलाय. छोटे बटाटे दम भरुन दमालु करावेत का कसे यावर संशोधन चालु आहे. नजिकच्या भविष्य काळात राई बटाटा अनुसंधान प्रतिष्ठाण स्थापनेचे प्रयत्न चालु आहेत.

मराठी माणुस व्यवासायात मागे पडतो. बटाट्यांच्या निमित्ताने आपण ही उक्ती खोटी पाडावी म्हणुन आम्ही व्यवसायात पडायचे ठरवले आहे. “लागले ( म्हणजे पडल्याने लागले) की कळवा” असे कुत्सित मराठी शेरे आम्हाला ऐकु आलेत पण त्यांच्याकडे पुर्ण दुर्लक्ष करुन सद्ध्या वडापावाचे आलिशान दुकान काढावे का “हॉट चिप्स” काढाव्या का आलु चाट ह्यावर उहापोह चालु आहे. तोपर्यंत “आमची कोठेही शाखा नाही” एवढा मजकुर छापुन ठेवायला सांगितलाय.

Posted in cultivation | Tagged , | 1 Comment

पीक पाणी

सांगायास अतिशय आनंद होतो की आमचा शेतीचा पहिला प्रयत्न सुफल जाहला! गेल्या रविवारी २१ मार्च ला बटाट्याच्या पिकाची काढणी केली. नांगर घालुन बटाटे काढले आणि मंडळींनी पाट्या भरुन भरुन गोळा केले. १० पोती भरले म्हणजे जवळ जवळ ३५० किलो. लई बेस. बटाटे गोरे गोमटे निघाले. खाणे – वाटणे – विकणे व्यवस्था सुरु आहे.

Posted in cultivation | 4 Comments

घडामोडी

राईवर ब-याच घडामोडी चालु आहेत. खालच्या भागात बोअरींग केले. उत्तम पाणी लागले. जवळच्या डीपीवरुन जागेवर वीज आली. त्यासाठी दोन पोल घ्यावे लागले. राईचे, रस्त्याने दोन भाग झालेत. त्यापैकी खालच्या भागात जेसीबी च्या मदतीने जमीन पाय-या पाय-यात सपाट करुन घेतली. पाच टप्पे झाले. ह्या उद्योगात, २००६ मध्ये लावलेली चार पाच झाडे उपटुन दुस-या जागेवर लावावी लागली. त्यातले माडाचे झाड पटकन रमले. इतर झाडे मात्र पार सुकुन गेली. बघुया जगतात का. मग मात्र पुढच्या पातळ्या करताना झाडांना हात लावला नाही. काही झाडांना, दोन दोन फुटाची मातीची भर पडली पण ती झाडे मजेत आहेत आता. काही जुनी, पोखरलेली झाडे, घायपात काढुन टाकले. ह्या कामात सगळीकडे तांबड माती लागली. नावाला १ – २ धोंडे सापडले.
ह्या टप्प्यांना स्टॅबिलाइज़ करण्यासाठी आता दगडांचे पिचिंग करायला घेतले आहे. मग झाडांना पार बांधायला घेउ.
एकीकडे खालच्या भागाला चेनलिंकचे कुंपण घालायला घेतले आहे. कुंपणाजवळची झाडी साफ करुन घेतली. कुंपणासाठी ८ – ८ फुट अंतरावर कॉंक्रीटमध्ये ६ फुटी सिमेंट पोल लावले. अर्धा फुट जमिनीखाली आणि अर्धा फुट जमिनीवर अशी १ फुट रुंदीची आणि १ फुट उंचीची दगडांची ताल रचली, त्यावर चेनलिंकचे कुंपण येईल.
बोअरवर २ एच पी २६ स्टेज चा पंप लावला.
सर्वांचे असे मत पडले की ही बटाट्याला चांगली जागा आहे. मग अकोले गावातुन बटाट्याचे बी ( म्हणजे रुजु शकतील असे बटाटेच असतात) मिळवले. औत चालवुन सरी पाडुन घेतल्या. २७ डिसेंबरला रविवारी बटाटे लावले. जमिनीत त्यांना आता कोंब आले आहेत. त्यांना २१ दिवसांनी पाणी द्यायचे आहे.
सध्या पाण्यासाठी वरच्या भागापर्यंत पोहोचणारे फ्लेक्सिबल पाईप्स घेतलेत. त्यामुळे झाडांना पाणी भरपुर मिळत आहे. काही झाडे त्यामुळे तरारुन फुटली आहेत.
ह्या वर्षी वरच्या दोन लिंबांना मिळुन ३० लिंबे आली. वरच्या पेरुला ४० एक पेरु होते पण ते सगळे लोकांनी तोडुन नेले . आम्हाला मिळाले नाहीत.

Posted in cultivation | 1 Comment

थेट पोस्टींग

राईवरुन पोस्टींग करते आहे. रिलायन्समुळे जमले. इथेच लॅपटॉप घेउन थेट. भन्नाट!

Posted in Uncategorized | Leave a comment

प्राणीसृष्टी

राईच्या पायवाटेवरुन परवा जात होतो, तर पायाखाली एक गवताची काडी तुरुतुरु पळत होती!

turu turu

turu turu

तहकीकात केली तर तो एक किडा होता. Praying Mantis असावा.

Posted in Uncategorized | Leave a comment

Banana plantation

There is a well tended and lush green Banana plantation on the way to Raee. It was planted the very year when we started our Raee venture. We have seen the first Banana trees grow by almost another foot every time we visited Raee on weekends.

Since then Abhay had this idea of planting Banana trees on Raee. He had also decided on the place for them. The lower left corner, where the water accumulates during rainy season. As you know Banana trees need lot of water. So the corner was deemed the ideal place for them.

Now with Bore well in place, it would be easier to water the trees. Any way with onset of the Monsoon, trees will not need watering for next 2 - 3 months. 

Abhay mentioned his idea of planting Banana trees to his friend from Jalgaon. Jalgaon is very famous for its Banana crop. The friend volunteered to send some Banana saplings.

On last Friday, he called Abhay from Jalgaon and said that 25 saplings were on their way. They are of the Mahalakshmi variety. They would reach the city on Saturday morning. So early morning saw us at the bus stand, wondering how are we going to transport these 25 saplings to Raee. But turned out that these were 25 corms, what we call “kand” in Marathi. They were well packed in a gunny bag. We took them to Raee.

The pits of 1 x1 foot were already ready.  We added some BSC powder for pest control and some manure as fertilizer.  Refilled the pit.

Planted around 9 – 10 corms in separate pits. Watered them.

 

We are already dreaming of Banana barfi and Banana cakes :)

Posted in Uncategorized | Tagged , , | 1 Comment

आणि या मातीतुनी चैतन्य गावे

कोणती पुण्ये अशी येती फळाला,

या तरुंनी आनंदे पालवावे!

बराच काल उलटला, इथे नोंदी करायला जमले नाही. पण सांगायला आनंद होतो की राई सुखात आहे. बहरते आहे. तळंगभुत सर्व तरुवेली,  वनचर, विहंग मजेत वाढत आहेत.  

काल परवा लावली असे वाटत होते तोवर ही रोपे बघता बघता रुजुन, तरारुन भरा-या मारु लागली आहेत. उंचीला माझ्यावर गेली आहेत!


 

गेली दोन वर्षे पाण्याची सोय करायला नाही जमले. शंकरनाना आणि निवृत्तीमामा जवळच्या नदीवरुन आणुन झाडांना पाणी घालतात.  आता ह्या वर्षी मे महिन्यात बोअर खणली. सांगायला आनंद होतो की तिला छान पाणी लागले. दोनशे फुटापर्यंत खोल नेली आहे.

राईवर आम्ही गेल्या दोन वर्षात ब-यापैकी उद्योग केले.

  • मेथी लाउन बघितली ती वाहुन गेली.
  • जीवामृत तयार केले, त्याने आधी झाडांना आंघोळ घातली, तर ती गेली गुदमरुन, मग त्यांची पानं धुवुन काढली. आता ते झाडांच्या मुळात घालतो तर ती तरारत आहेत.
  • झाडांना दशपर्णीचे औषध घातले.
  • पालवीच्या ऋतुत म्हणजे वसंताच्या आधी मग परत आषाढाआधी आणि सावन-भादोत बांगडी पद्धतीने खत दिले. हे झाडांना चांगले मानवले.
  • उन्हाळा बाधु नये म्हणुन बाळांना टोप्या घातल्या
  • लिंबावरच्या अळ्या खुन्नस घेउन मारल्या :)
  • झेंडुच्या फुलांची पैदास केली
  • मोठे प्लॅस्टिक पैदा केले, त्याचा वापर जांभळाचे झाड गदागदा हलवुन जांभळे गोळा करण्यासाठी केला. राईवरच्या दोन आधीच असणा-या झाडांना मस्त चवदार आणि भरपुर जांभळे येतात.  या वर्षी भरपुर खाल्ली.
  • शेजारचा फणस बरका आहे बरका, त्याचे गरे चापले.
  • तुतीला अप्रतीम फळे आली, ती आधाश्यासारखी खाल्ली.
  • लिंबे आहेत – नाही ईडलिंबे आहेत – नाही लिंबेच आहेत हा खेळ खेळलो
  • राईवर निवांत बसुन राहिलो आणि आपण केवळ वर वर जाणारी धुराची लकेर आहोत अशी कल्पना केली आणि डोंगराएवढे झालो.

- तर जे वाट्टेल ते केले. आणि जेंव्हा वाटले नये करु काही तेंव्हा नाही केले!  राईने आम्हाला खुप काही दिले, आम्ही विनासंकोच घेत गेलो.

Posted in cultivation | Leave a comment

जीवामृत – झाडांचे टॉनिक

जीवामृत

१० लीटर गोमुत्र

१ किलो गुळ

१ किलो बेसन

१ घमेले जागेवरची माती

३ – ४ घमेले शेण

१०० लीटर पाणी

सर्व एकत्र करुन एक आठवडा ठेवावे. रोज एकदा हलवावे. नंतर, तयार झालेले द्रावण झाडांच्या बुंध्यात-मुळांत खताप्रमाणे घालावे. झाडांवर उडवु नये.

गुळ व बेसन या अन्नामुळे मातीतले जीवाणु वाढतात. हे जीवाणु मातीतील खानिजे व अन्नद्रव्ये झाडाला खाण्याजोगी करतात.

Posted in cultivation | Leave a comment