Posted by: manura | June 3, 2007

पुर्वतयारी

आधी विचार करत होतो की या हंगामात फक्त कडे कडेने फुलणारे वृक्ष लावायचे. खड्डे करायला घेतले होतेच.

पण मग विचार झाला की हे वर्ष कशाला वाया घालवायचे? सगळ्या जमिनीवर झाडे लावावीत. तेवढीच झाडे वाढतील. खड्डे घ्यायचे काम जोरात सुरु केले. त्यात निवृत्ती आणि शंकर यांच्या घरच्या कामांची पण घाई, पाउस यायच्या आधी भात पेरायचे होते. जळण आणुन साठवायचे होते. तरी मंगळवार पर्यंत करतो म्हणाले.

कोणती झाडे आणावीत? कशी लावावीत? यावर विचार केला. मुख्यत: आंबे, रातांबे, आवळा, चिकु, पेरु, जांभुळ, नारळ, मिरी ही फळझाडे, गुलमोहोर, पेल्टोफोरम, तामण, बहावा, बुच, सोनचाफा हे फुलवृक्ष. कडुनींब, पिंपळ, कदंब, रक्तचंदन हे संस्कृतीवृक्ष अशी निवड केली. ऍग्रोवन साइटवरुन चांगल्या जाती कुठच्या हे टिपुन घेतले.

तसे कुठली झाडे लावायची? जमीन, हवामान, पाणी कशाला अनुकुल आहे? असा उहापोह सतत चालु असायचाच. त्या अभ्यासात आणि इतरही ठिकाणी दापोलीच्या कृषी विद्यापीठाला सर्वांनी पहिला क्रम दिला होता. अभयच्या स्वभावानुसार त्याने आधीच ठरवले होते की आपण एवढ्या निगुतीने सांभाळणार, तर रोपे प्रथम प्रतीचीच हवीत. तेंव्हा दापोलीला जाणे क्रमप्राप्त होते. रोपांची यादी शंभर सवाशेपर्यंत पोहोचली. तेंव्हा इथुनच ट्रक करुन जायचे ठरले. पाउस उंबरठ्यावर येउन ठेपला होता, त्या आधीची वेळ साधायला हवी होती. येता शनीवार, दुसरा शनीवार असल्याने, विद्यापीठाला सुट्टी. तेंव्हा अभयने शुक्रवारी सुट्टी टाकली.


Leave a response

Your response:

Categories