कालच्या कोकणस्वारीनंतर अभय दमला होता पण अजुन खुप कामं राहिली होती. तिथे गेल्यावर बघितले तर मंगळवारचा वायदा करुन खड्डे झालेच नव्हते. जे झाले होते ते योग्य खोलीचे नव्हते. शंकर दोन दिवस झाले येत नव्हता. रोपे तर येउन दाखल झाली होती. वर जाउन बघितले तर शेळ्या मोकाट चरत, राईपर्यंत पोहोचल्या होत्या.
हे सर्व पाहिल्यावर, आम्ही हाती घेतलेल्या प्रकल्पावर अजुन खुप काम बाकी आहे हे प्रकर्षानं जाणवलं. अजुन सगळे खड्डे व्हायचे होते, मधले खड्डे व्हायचे होते, शेणखत आणायचे होते, शेळ्यांमुळे जाणवले की कुंपणही तातडीने घालायला हवे. प्रसंगाचे गांभीर्य जाणवायला लागलं निवृत्तीच्या बोलण्यात आले की हे नक्षत्र- मृग तर असेच उन पाउस जाईल पण पुढचे आर्द्रा मात्र बरसेल. म्हणजे आमच्याकडे उणेपुरे दहा-बारा दिवस आहेत. तोवर झाडे लागायला हवीत, एकदा पाउस सुरु झाला की चिखलात रोपे कुजुन जातील. वेगाने कामे व्हायला हवीत.
अभयने मग निर्णय घेतला, की आता जोर लावायलाच हवा. असे शनीवार – रवीवार राईवर येउन भागणार नाही.
आज गेलो तर , शंकर उगवला होता, काल जळण भरायला गेला होता. अजुन माणसं सांगितली होती त्यांचा पत्ता नव्हता. दळ हलवायला हवे होते.
बाळुने सल्ला दिला की लमाण लोकांना बोलावुन काम करुन घ्यावे. पण मग ठरवले की नाही काम गावातल्या लोकांना द्यावे. त्यांना रोजगार मिळेल. बाळुने गावातल्या माणसांना बोलवुन आणले. वसंत आणि अशोक. त्यांना खड्डे पाडायचे काम अंगावर दिले. नवीन खड्ड्याचे ६० रु आणि जुने खड्डे ३ x ३ x ३ फुटाचे करायला २५ रु. असा सौदा पटला. तीन जोड्या बोलावुन बुधवारपर्यंत काम होईल म्हणाला.
शंकर आणि निवृत्ती यांना खड्ड्याच्या जागा मार्क करणे, खत उतरवुन दगड लावुन ठेवणे, कंपाउंड साठी तयारी करणे ही कामे दिली आहेत.
बाळुने सिवील कामे करणा-या विश्वनाथशी गाठ घालुन दिली. हा कुंपणाचे सिमेंट पोल्स, कुंपण काम, फॅब्रिकेशन, बांधकाम सगळे करतो. त्याला १५ पोल्स ची ओर्डर दिली आहे. ३० रु. फुटाप्रमाणे ६ फुटाच्या प्रत्येक पोलची किंमत १८० रु. सोमवारपर्यंत पोल्स राईवर येतील. बांबु सांगितले आहेत. पोल्स मग सिमेंट कॉंक्रीटमध्ये बसवुन, मध्ये बांबु घालुन, बाईंडींग तारेचे कुंपण घालायचे ठरवले आहे. हे थोडे कमी पक्के असेल, पण एकतर, समथींग इज बेटर दॅन अगदीच नथींग! आणि पुढे हे पोल पक्क्या कुंपणात वापरता येतील.
सोमवारी खताची ट्रॉली येईल. ते मातीत मिसळुन टाकुन घ्यायचे आहे. या आठवड्यात अश्या प्रकारे सर्व तयारी पूर्ण करायला हवी. अभयला पुढच्या आठवड्यात जवळ जवळ रोज राईवर चक्कर टाकावी लागेल नाहीतर कामे व्हायची नाहीत. पुढच्या शनीवारी रोपे लागायला पाहिजेत.
मोठी हातघाई चालु आहे खरी. पण ही जमीन कसायची हौस आहेच तशी नख-याची! येरागबाळ्याचे काम नोहे. हिम्मत हवी आणि पैशाचे पाठबळ हवे.
एक मात्र खरं की या सर्व खटाटोपामुळं जमिनीची, निर्मितीची नवनवीन रुपं मात्र जवळुन पहायला मिळतात.
आमच्या हालचालीवर नजर ठेवणरा डोंगरांएवढाच पुरातन सरडा, आठवड्याला फुटाफुटानं वाढणा-या केळी. जळीत जमिनीवर जोमानं वाढणारे कसदार वेल, आर्द्र पण भुसभुशीत, रोपांसाठी आसुसलेली जमीन, मातीचे वेगवेगळाले पोत, काही झाडांची भोळी पोपटी पालवी, तर काहींची आग्रही आणि उग्र जांभळी तांबडी. माणसांची जळण भरायची लगबग तर मुंग्यांची अन्नकण साठवायची.
आत्तापर्यंत ‘नक्षत्र’ हे विशेषण होतं माझ्यासाठी, आता ते मॄग आणि आदडा(आर्द्रा नव्हे) होऊन शर्यत लावायला लागलं आहे. सत्तावीस वजा सात ही माझ्यासाठी आता गोष्ट नाही राहिली. तुम्हाला सांगते, राईचा सगळा आसमंत, जमीन, झाडं हवा, डोंगर हे सगळे निर्मितीच्या शक्यतांनी ओथंबुन, खोळंबलेत, मला तो रेटा माझ्या रंध्रात जाणवतोय, मी श्वास रोखुन खेळी करतेय. आणि देवाजीकडे मागणं मागतेय की दान आमच्या मनाप्रमाणे मिळो.
Filed under: cultivation





Hi dear..
My best wishes for your effort.
May god bless you with good season and awasome returns..
Take care and keep posting
Amit
Actually I am little bit curious about all this venture.
Where is your farm?
Even I am working on similar project.. may be we can share our experiences.
my email id is amit.teli@gmail.com
Rgds,
Amit
chaan lihila aahe….vegalach jag aahe..