Posted by: manura | June 18, 2007

राई रखमाबाई राणी या सकळा

कामाचा सूर mast चांगला जुळू लागला. अभय जवळ जवळ रोज सकाळी राईवर चक्कर मारत होता. सकाळी उठुन आधी राई मग ऑफिस. आणि ऑफिसला जायला उशीर म्हणुन यायला उशीर. खड्डे पडु लागले. शेणखत आलं दोन ट्रॉल्या. गांडुळखत मेहंदळे गॅरेजजव्ळुन उचललं. मग बाया पण कामाला बोलवल्या. गडीमाणसं खड्डे पाडत होती. बाया, शेणखत, गांडुळखत आणि माती मिसळुन ते परत भरुन घेत होत्या

middleview.jpg

हे सगळे होत असताना लक्षात आले की या सगळ्या झाडांना कुंपण हवे. नाहीतर हौसेने लावलेली झाडे, गाई-बक-यांचे जेवण व्हायची. सिमेंट पोल्स, काटेरी तारा असं साग्र संगीत कुंपण घालयचं म्हणजे बराच खर्च आला असता. मग मध्यम मार्ग शोधला. एकुण २३ सिमेंट पोल घ्यायचे ठरवले. मग विश्वनाथचे वायदे, पोल्स आज येतील, उद्या येतील. त्यानंतर त्याच्यावर बाईंडींग वायर ओढुन घ्यायची होती. पोल्स अजुन लागत होते. मग एक दिवस परत एकदा सगळ्या टोळीने सीमा बांधणी केली. अभयने इतक्या वेळा इतक्या लोकांबरोबर त्या बॉर्डरच्या खुंट्यांवरुन दोरी ओढुन बघितले आहे की बस. एकी कडे पोल्स लागत होते आणि एकी कडे खड्डे भरणे चालले होते. पावसानी जरा उसंत दिली आहे.

left_side_view.jpg

right.jpg

ढग येउ लागले आहेत पण पावसाचा अजुन पत्ता नाही. हा आठवडा तर मिळाला. शुक्रवारी झालेल्या कामाचा आढावा घेतला आणि ठरवले की शनीवार रवीवारात झाडे लावायची. शरद काकांच्या हस्ते पहिले झाड लावुन सुरवात करायची. पण शुक्रवारी कळले की काकांना बरे नाही. मग इतर तरी झाडे लावुन घ्यायचे ठरवले.

pavasali.jpg

 

पावसाने अजुनही हजेरी लावली नव्हती, म्हणुन एकीकडे हायसे वाटत होते आणि एकीकडे काळजीही वाटत होती. कारण झाडे लावायला वाव मिळणार होता. हा बाबा जर आधीच कोसळला तर खड्डे तुंबणार, खत वाहुन जाणार, आणि झाडे लावायलाही कटकटीचे जाणार. आणि नाहीच आला तर झाडांच्या पाण्याचा प्रश्न. शनीवारच्या मोहीमेची तयारी केली. गडी सांगितले, खड्डे आणि कुंपणासाठी. आणि ५ बाया, रोपे ने-आण, पाणी घेउन येणे घालणे या साठी. कृषी अधिकारीही बघायला येतो म्हणाले. जमिनीच्या व्यवहारापासुन आमच्यासाठी काम करणारा मनोहर ही दोन दिवसांपासुन राईवर देखरेख करायला येत होता. हे झाडांचे काम काढल्यावर कळले की किती मनुष्यबळ लागते. मला वाटते ह्याचसाठी पुर्वी अष्टपुत्र लागत असणार!! दुसरी कायम अडचणीत टाकणारी गोष्ट म्हणजे परिवहन (ट्रान्स्पोर्ट!) शेणखत जागेवर स्वस्त वाटते पण ते राईवर वाहुन आणायचे म्हणजे ट्रॉलीचा खर्च आला. तसाच पोल्स, बांबु, रोपे, दगड सर्वात, परिवहनाचा जिझिया धरावा लागतो.

khadda.jpeg
topview_khadde.jpg
fertilizing.jpg

 

शनिवारी चिनीची शाळा झाल्यावर, जेउन निघालो. वाटेत कृषी अधिकारी, मनोहर असे पॅसेंजर घेत राईवर पोचलो. दळ वाटच बघत होतं. आधी आंब्याची झाडं लावायला घेतली, भरलेल्या खड्याच्या मध्यभागी एक बेतशीर खड्डा खोदायचा, पाणी घालुन तो ओला करायचा, मग रोपाच्या मुळांभवतीची पॉलिथीन पिशवी कापुन अलगद, मुळांना धक्का न लावता, काढायची, मग ते रोप त्या खळग्यात, उभे धरुन माती भरायची. रोपाचा डोळा भरला असेल तर तो मातीवर राहील अशी काळजी घ्यायची. मग ते रोप पायाचा अंगठा आणि पहिलं बोट या मध्ये धरुन, बाजुची माती बेतशीर दाबत गोल फिरुन अळं तयार करायचं आणि शेवटी त्या आळ्यात कळशीभर पाण्याचं अर्घ्य द्यायचं. निघालेली पॉलिथीनची पिशवी उचलुन घ्यायची नाहीतर, त्याचा कचरा होणार.

jhade_lavane_1.jpg
jhade_lavane_2.jpg
jade_lavane_3.jpg

 

मग हीच प्रक्रीया पुढच्या झाडासाठी! झाडांसाठी लागणारं पाणी पार अर्ध्या किलोमीटरवरुन आणावं लागत होतं. त्यामुळे बायकांची रांग पाण्यासाठी. एकीकडे झाडे लावत होतो, गडी कुंपणाच्या तारा ओढुन घ्यायला लागले होते. कृषी अधिका-यांना परत जायला लिफ्ट मिळाल्याने ते लवकरच परत गेले. तीनच्या सुमारास अभय आणि चिनी जाउन सगळ्यांसाठी वडापाव घेउन आले. मग आम्ही पाच वाजेपर्यंत काम करत होतो. ब-यापैकी आंब्याची झाडं लावुन झाली. आणी त्या दिवशी थांबायचे ठरवले. बारीक पाउस पडुन गेला. पावसाची गम्मत चालु होती. कधी धरणात पडताना दिसायचा, कधी सुरेशसाहेबांच्या शेतात तर कधी आमच्या राईवर गुलाबजल शिंपडुन जायचा.

त्या दिवशी काम संपल्यावर आम्ही धरणाच्या पलिकडच्या बाजुला असलेल्या बंगल्यावर थांबलो. या जागेची माहिती आम्हाला अचानकच मिळाली. ८-९ खोल्यांची सोय असलेल हा बंगला – धरण – बॅकवॉटर-डोंगररांगा यांचं विहंगम दृष्य दिसेल अश्या डोंगर उताराच्या १५ एकरावर वसला आहे. शहरातल्या एका वकिलांनी आधी स्वत:साठी बांधलेलं हे नंदनवन आता इतरांसाठीही उपलब्ध करुन दिलं आहे. दमुन आल्याने अंग चांगलं दुखत होतं. बाहेर हिरवळीवर बाक टाकुन, ढगांचा लपंडाव, आणि सायंता-यांची हळुह्ळु निखरत जाणारी आरास बघत गप्पा मारताना, शीण निघुन गेला. उन उन आमटी भात खाउन डोळा कधी लागला ते समजलेच नाही.

khire.jpg

दुस-या दिवशी इडलीचा नाश्ता करुन राईवर आलो. आता एकीकडे कडेची फुलझाडे लावायला घेतली. आणि अभय ने कुंपणाचे काम जोरात सुरु केले. बाया आणि मी झाडे लावत होतो. उठ-बस आणि वाकुन कंबर चांगलीच लागुन येत होती. आपण किती ‘बिनकामाचे’ आहोत याची जाणीव होत होती. आज गुलमोहोर, पेल्टॊफोरम, तामण, बहावा, सोनचाफा, नारळ, तुती, आवळा, चिकू, जांभूळ, रातांबे अशी निरनिराळी झाडे मधल्या खड्यात लावली. रातांब्याची दोन-दोन झाडं एका खड्ड्यात लावली. आता नर मादी कळले की कोणती ठेवायची ते ठरवायचे.

झाडं लावुन झाली आणि पाउस चांगला लागुन आला. काय बरं वाटलं! काम तर झालं होतं, आणि आसुसलेल्या जमिनीला आणि नुकत्याच रुजलेल्या झाडांना तृप्त करत सरी बरसु लागल्या.

जीव कसा सुपाएव्ह्ढा झाला. अभयने गेला आठवडाभर लावुन धरलेला नेट, गेले दोन दिवस आम्ही करत असलेली मेहनत सगळे सफल झाले. पावसानं साथ दिली, दान आमच्या बाजुनं पडलं. रोपांबरोबर आम्हीही त्या धारा झेलत उभे राह्यलो. गालावर ओघळलेलं सगळंच पाणी पावसाचं नव्हतं.


Responses

  1. जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
    असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
    की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
    एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर


Leave a response

Your response:

Categories