कोणती पुण्ये अशी येती फळाला,
या तरुंनी आनंदे पालवावे!
बराच काल उलटला, इथे नोंदी करायला जमले नाही. पण सांगायला आनंद होतो की राई सुखात आहे. बहरते आहे. तळंगभुत सर्व तरुवेली, वनचर, विहंग मजेत वाढत आहेत.
काल परवा लावली असे वाटत होते तोवर ही रोपे बघता बघता रुजुन, तरारुन भरा-या मारु लागली आहेत. उंचीला माझ्यावर गेली आहेत!
गेली दोन वर्षे पाण्याची सोय करायला नाही जमले. शंकरनाना आणि निवृत्तीमामा जवळच्या नदीवरुन आणुन झाडांना पाणी घालतात. आता ह्या वर्षी मे महिन्यात बोअर खणली. सांगायला आनंद होतो की तिला छान पाणी लागले. दोनशे फुटापर्यंत खोल नेली आहे.

राईवर आम्ही गेल्या दोन वर्षात ब-यापैकी उद्योग केले.
- मेथी लाउन बघितली ती वाहुन गेली.
- जीवामृत तयार केले, त्याने आधी झाडांना आंघोळ घातली, तर ती गेली गुदमरुन, मग त्यांची पानं धुवुन काढली. आता ते झाडांच्या मुळात घालतो तर ती तरारत आहेत.
- झाडांना दशपर्णीचे औषध घातले.
- पालवीच्या ऋतुत म्हणजे वसंताच्या आधी मग परत आषाढाआधी आणि सावन-भादोत बांगडी पद्धतीने खत दिले. हे झाडांना चांगले मानवले.
- उन्हाळा बाधु नये म्हणुन बाळांना टोप्या घातल्या
- लिंबावरच्या अळ्या खुन्नस घेउन मारल्या
- झेंडुच्या फुलांची पैदास केली
- मोठे प्लॅस्टिक पैदा केले, त्याचा वापर जांभळाचे झाड गदागदा हलवुन जांभळे गोळा करण्यासाठी केला. राईवरच्या दोन आधीच असणा-या झाडांना मस्त चवदार आणि भरपुर जांभळे येतात. या वर्षी भरपुर खाल्ली.
- शेजारचा फणस बरका आहे बरका, त्याचे गरे चापले.
- तुतीला अप्रतीम फळे आली, ती आधाश्यासारखी खाल्ली.
- लिंबे आहेत – नाही ईडलिंबे आहेत – नाही लिंबेच आहेत हा खेळ खेळलो
- राईवर निवांत बसुन राहिलो आणि आपण केवळ वर वर जाणारी धुराची लकेर आहोत अशी कल्पना केली आणि डोंगराएवढे झालो.
- तर जे वाट्टेल ते केले. आणि जेंव्हा वाटले नये करु काही तेंव्हा नाही केले! राईने आम्हाला खुप काही दिले, आम्ही विनासंकोच घेत गेलो.
Filed under: cultivation








