खंडु बटाटे…

जसजशी राई फळुफुलु लागली तशी आमच्या घराला, वाहनाला शेतकी कळा येउ लागली. गाडीची डिकी उघडली तर त्यात काय सापडेल याचा नेम राहिला नाही. कधी गमबुट, कुदळ फावडे, तर कधी ठिय्या देउन बसलेला टमटमीत चिकाळ फणस. गावाकडची मंडळी नुकतीच गाडीत बसुन गेली असली तर गाडीत अस्सल गावाचा शेणा-खताचा – तांबड्या मातीचा वास परमळतो.

डिसेंबरमध्ये खालच्या जमिनीत खाचरं तयार करुन घेतली आणि बोअर मारली. आणि अगदी खालच्या दोन वावरात बटाटा पेरला. पंप बंद पडणे, वीज बेभरवश्याची असणे हे नेहमीचे घटक होतेच. दुसरे एक ठरवले की शक्यतो जैविक शेती करायची. रसायनांचा उपयोग करायचा नाही. बटाट्याची रोपे तरारली. मुळाला बाळ बटाटे लागले. – हो आमची बाग माकडाची असल्याने आम्ही हळुच खणुन पण पाह्यले. :) ३ एक महिन्यात रोपं सुकायला लागली. हे बटाटे तयार झाल्याचे लक्षण. २१ मार्च ला काढणी केली. अभय ९ पोती – अंदाजे ३५० कि. बटाटे गाडीत भरुन घेउन आला.

.. आणि तेंव्हा पासुन आमचे “खंडु बटाटे” झाले आहेत. आईकडे एका खोलीभर बटाटे पसरले आहेत. तिथे बटाट्यांची घाउक देवाण घेवाण होते. बटाटे न्याहाळुन ते कशे गोरे गोमटे, गुळगुळीत, पातळ सालीचे मोठे आहेत ह्याची आम्ही कौतिकं करत असतो. अधुन मधुन जाउन बघुन अजुन आहेत ह्याची खात्री करुन घेतो :) त्यातले काही खराब वाटले तर हळहळतो. आमच्या शेतातल्या बटाटा खाल्याने वार्धक्य सोडुन इतर सर्व व्याधी दुर होतात असे छातीठोक प्रतिपादन करतो. आमच्या बटाट्यांबद्दल उणा तर जाउच द्या शंकावाचक उद्गार ही आम्ही खपवुन घेत नाही! लगेच एल्गार पुकारतो. एकदम वेपन्स अ‍ॅट डॉन!
तिथेच पिशव्या भरुन बटाटे नातेवाईक, ओळखीचे, शेजारचे यांना नेउन दिले. बाहेर गावच्या नातेवाईकांना एस्टीत चढवुन पाठवले. अभयने एक पोते ऑफिसला नेले. आणि पिशवी आणा – बटाटे न्या या तत्वावर वाटले. चिनीची परिक्षा आहे म्हणुन नाहीतर तिला दारात एक टेबल आणि वजन काटा टाकुन द्यायचा विचार होता. कधी नव्हे तो तिला मग अभ्यासाचा पुळका आला.

तर दुसरीकडे स्वैपाकघरात बटाटा महोत्सव सुरु झाला. आधी फ्रेंच फाईस झाले. मग भाज्या, रस्से, कोशींबीर, पराठे झाले. सद्ध्या घरात पोहे ही बटाटा पोहे होतात. मग वाळवणे सुरु झाली. कीस झाला. वेफर्स झाले. आता कलकत्ता, आसनसोल आणि टिंबक्टु येथिल नातेवाईकांना बटाटे न पाठवता आल्याने कीस कुरियर ची व्यवस्था करण्यात आली. वेफर्स ची किसणी जाड झाल्याने परत एकदा पातळ वेफर्स चा घाट घातलाय. छोटे बटाटे दम भरुन दमालु करावेत का कसे यावर संशोधन चालु आहे. नजिकच्या भविष्य काळात राई बटाटा अनुसंधान प्रतिष्ठाण स्थापनेचे प्रयत्न चालु आहेत.

मराठी माणुस व्यवासायात मागे पडतो. बटाट्यांच्या निमित्ताने आपण ही उक्ती खोटी पाडावी म्हणुन आम्ही व्यवसायात पडायचे ठरवले आहे. “लागले ( म्हणजे पडल्याने लागले) की कळवा” असे कुत्सित मराठी शेरे आम्हाला ऐकु आलेत पण त्यांच्याकडे पुर्ण दुर्लक्ष करुन सद्ध्या वडापावाचे आलिशान दुकान काढावे का “हॉट चिप्स” काढाव्या का आलु चाट ह्यावर उहापोह चालु आहे. तोपर्यंत “आमची कोठेही शाखा नाही” एवढा मजकुर छापुन ठेवायला सांगितलाय.

Advertisement
This entry was posted in cultivation and tagged , . Bookmark the permalink.

One Response to खंडु बटाटे…

  1. manjiri says:

    checking

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s