Posted on May 30, 2007 by manura
पाउस राजा येणार अशी वाजंत्री जशी वाजु लागली तशी कामांची एकच झुम्मड उडाली आहे.
अभय जाउन येथल्या कृषीअधिका-यांना भेटुन आला. त्यांनी खुप आपुलकीने आणि उपायुक्त माहिती दिली. कोणती झाडे घ्यावीत, कशी लावावीत इ.
आमच्या राईवर होणा-या वा-या वाढल्या. आजच जाउन, जागेवर कुठे खड्डे घ्यायचे त्याचे मार्कींग करुन आलो. कृषीअधिकारी आपणहुन आले त्यांनी योग्य मार्कींग करायला मदत केली.
ह्या वर्षीच लागवड सुरु करायचा बेत करत आहोत. तसे अजुन कुंपण झाले नाही. जनावरे शिरण्याचा धोका आहे, पण एक वर्ष वाया जाईल म्हणुन जोखीम घेत आहोत. बघुया. हे ही एक शिक्षण अनुभव नावाच्या गुरुकडुन. आंबा, पेरु, रातांबा, जांभुळ, आवळा, आणि कुंपणाला मोठी झाडे, कडुनींब, शेवगा, पिंपळ, बुच, बहावा, आमलताश लावावा असा विचार आहे.
बरोबरीने अभ्यास ही चालु आहे. कोणत्या जाती घ्याव्यात? कशी पेरणी करावी? पाणी किती लागेल? ऍग्रोवनची वेबसाईट खुपच उपयुक्त वाटली. आता काही पुस्तके मिळवायला हवी.
येत्या ८ – १० दिवसात झाडे येतील. पावसाबरोबरची शर्यत जिंकायला हवी.
आसपासच्या शेतात काम जोरात चालु आहे, उस बांधायचाय, औत चालवायचेत, पण औतगडी मिळत नाहीयेत, भात पेरायचाय. शेवटचे राहिलेले आंबे उतरवायचेत, एक ना दोन हजार कामे, नुस्ती लगीनघाई आणि बारात तो अभी आ जायेगी!
Filed under: cultivation | Leave a Comment »
Posted on May 20, 2007 by manura

सध्या कामांना जोर आलाय.
राईच्या दोन्ही बाजुंना असणा-या जमिनींवर बांधकामांची हालचाल दिसु लागली आहे. दोन्ही शेजा-यांनी JCB लावुन डोंगर फोडुन रस्ते काढले आहेत. तांबडी लाल माती खोदली जाते आहे.
पावसाळा उंबरठ्यावर येउन ठेपला आहे. मावळतीच्या अंगाने ढगाची चढाई आत्ता सुरु होईल. त्यामुळे सगळीकडेच कामांची घाई सुरु झाली आहे. शेतात औत सुरु झाले आहेत.
जमिनीच्या कडेकडेने खड्डे घ्यायला सुरुवात केली आहे. अजुनही जमिनींच्या सीमांचा नीट अंदाज येत नव्हता. खड्डे शीवेवर नीट यावेत म्हणुन दोरी लावुन घ्यायला हवी होती. मग पेठेत जाउन सव्वशे मीटर दोरी घेउन आलो.
राई पार सुकुन गेली आहे. तोडणी, भाजणी झाल्यावर मोकळं वाटतंय. पार खालपर्यंत दिसुन येत आहे.

मोजणी करताना, जमिनीच्या कोप-यांवर खुंट्या ठोकुन ठेवल्या होत्या. खुंट्यांमध्ये दोरी लावली, आणि बॉर्डरपासुन एक फुटावर खड्डा सुरु केला. प्रत्येक खड्डा १.५ x १.५ x १.५ चा. दहा दहा फुटावर खड्डे खोदायचे काम सुरु आहे.
Filed under: cultivation | Leave a Comment »
Posted on May 6, 2007 by manura
तुम्हाला आठवत असेल, डिसेंबरमध्ये आम्ही शंकरनानांच्या वाडीवर तंबू ठोकुन मुक्कामाला गेलो होतो? काल त्यांच्या धाकट्या मुलीचं लग्न होतं. शंकरनानांनी येउन रितसर पत्रिका दिली. पाहतो तर काय, पत्रिकेवर अभयचं नाव छापलेलं! अभय एकदम सेंटी झाला!
आम्ही उभयत: लग्नाला गेलो होतो. गावच्या देवळात लग्न होतं. मुहुर्त संध्याकाळी पावणे पाच चा होता. पोहोचता, पोहोचता उशीर झाला आणि आमची वरातीमागनं घोडं अशी गत झाली.
फोटोंचा कार्यक्रम चालला होता, करवल्या आणि नवरीचे भाउ भाव खाउन होते. पिंकी “शादीका जोडा’ लेउन पोक्त दिसत होती. आमचं रीतसर, माईकवर अनाउन्स करुन, “श्रीफळ” देउन स्वागत केलं
पंगतीला कळीचं जेवण होतं. आहेर, परत आहेर असं सारं साग्रसंगीत पार पडलं.
पिंकी सौख्यभरे नांदो ही श्रीचरणी प्रार्थना!
Filed under: लोकवाणी | 1 Comment »
Posted on April 20, 2007 by manura
ह्या वर्षीच्या पावसाळ्यात झाडांची लागवड सुरु करायचा बेत आहे. त्या दिशेने पहिले पाउल म्हणुन राईत उगवलेले गचपण आणि खुरटी झुडपे साफ करुन घेतली. शंकरनाना आणि निवृत्तींदादांना कंत्राट दिले. त्यांनी सगळे रान तोडुन मोकळे केले. मोठी झाडे, आंबे, घळी भोवतालच्या दाटीला अजिबात हात लावला नाही. तळाच्या जाळ्या मोकळ्या केल्या.
शेजारचा उस तोडुन व्हायचा होता म्हणुन जाळायसाठी थांबले होते. तर शेजारच्या शेतक-यानेच त्याचा उस पेटवला आणि राबाबरोबर आंब्याची झाडे पण पेटली.
हा एक प्रश्नच झाला. अश्या आगींपासुन कसं वाचवायचं राईला?
ह्या वर्षी कडेकडेने फुलवृक्ष लावायचा बेत आहे. पेल्टोफोरम आणि तामण सारखे दर ऋतुत फुलणारे, बहावा, गुलमोहोरासारखे उन्हाळी, बुच, चाफ्यासारखी सुगंधी. बघुया काय काय जमते ते.
पाउस पडायच्या आधी खड्डे घेउन, शेणखत पडायला पाहिजे.
Filed under: cultivation | Leave a Comment »
Posted on December 24, 2006 by manura
अभयने अमेरिकेहुन येताना एक आटोपशीर तंबू आणला. त्याचे उद्घाटन राईवर करायचा विचार चालु होता. पण जरा जवळपास जाग असावी म्हणुन वाडीवरच्या शंकरदादांच्या शेतात तंबू ठोकायचं ठरलं. शंकरदादांच्या घरी रात्रीचे जेवण, तंबू आणि शेकोटी असा बेत केला. शंकरदादा आणि त्यांच्या कुटुंबाने इतक्या आपुलकीनॆ आदरातिथ्य केले की बस! जेवणाला तांदळाच्या भाकरी, कोंबडीचं मटण (!) आणि पावट्याची उसळ, पंगतीला शंकरदादा, त्यांची कारभारीण, पिंकी – त्यांची मुलगी, दोन मुलगे, घरची म्हातारी, बाळु, त्याची बडबडी बायको संगीता, त्यांचा धाकटा, परदीप आणि टिपु कुत्रा हे सगळे, मस्त शेकोटी पेटवुन गप्पा मारत बसलो. भाता शेताचा, गुराढोरांचा अनोळखी वास, मिट्ट काळोख, ता-यांनी लखलखणारं आभाळ! सगळंच नवीन! सगळी माणसं म्हणु लागली, ‘अहो, घरी जागा भरपूर आहे, झोपा आरामात!’ आता यांना काय सांगणार की आम्ही तंबूसाठी तर आलोत! मग त्यांनी ‘पावणं जरा चक्रमच असा चेहरा केला आणि आम्हाला आमच्या तंबूत सोडुन झोपायला घरी गेले, १०० पावलावर च्या झोपडीत. आम्ही तिघं चिनी, अभय आणि मी तंबुत गुडुप छान झोपलो. सकाळी उठुन बघतो तर टिप्याने राखण चांगलीच मनावर घेतलेली!

हिरवी गार सकाळ, दहीवरलेली शेतं

मग ‘ये माजरा क्या है?’ बघायला आलेल्या शेतक-यांचं फोटोसेशन झालं

असा मस्त तंबू निवास करुन राई ला भेट देउन परत आलो.

Filed under: visits | Leave a Comment »
Posted on September 8, 2006 by manura
तुम्हाला आठवत असेल, जुनमध्ये मी नमुद केले होते की दिवे आगरहुन आणलेल्या रातांब्याच्या बिया मी आई-बाबांच्या बागेत पेरल्या. उदय बापटांनी सांगितल्याप्रमाणे गेले चार महिने आम्ही धीर धरुन कोंब यायची वाट पाहिली. माकडाची बाग अजिबात होऊ दिली नाही. आमच्या ‘सब्र का मीठा फल’ उगवु लागले आहे.

आई-बाबांची बाग पण बहरली आहे. नाना जास्वंदी, स्नो ड्रॉप आदि गुलाब, फुलले आहेत.
बाबांची ‘झेंडुची फुले’ दस-यासाठी ऑन स्केड्युल आहेत. अधिक माहिती १५ – २० दिवसात उपलब्ध!
Filed under: Uncategorized | 1 Comment »
Posted on August 24, 2006 by manura
‘ये तेरा घर ये मेरा घर
किसीको देखना हो गर,
तो पहले आके मांग ले,
तेरी नजर, मेरी नजर’
तसं बघायला गेलं तर, शेकडो जमिनीचे तुकडे आहेत त्या भागात. शेकडो धबधबे कोसळतायत. पण आमची राई कशी लाखात एक आहे, आमचा कसा ‘झरा वाहतो नक्षत्रांचा’ हे पाहायला आमची ‘नजर’ हवी.
गौराईची फुलं फुलली आहेत डोंगरावर. आजीबाईंनी सांगितलं की ही फुलं गौरीच्या सणाला गौरी म्हणुन पुजतात. ‘बगा आता पुन्याला गेला मंजी विचारतील तुमाला, एक का आनलीत? चांगली चार पाच आनायची’ तसेच झाले, वॉचमनकाका अगदी तसेच म्हणाले.

ही एक वळण्याच्या धबधब्यांची करामत, उंचावरच्या पाण्याच्या धारा खाली वहायच्या ऐवजी वा-यासंगे धारानृत्य करताहेत.

Filed under: Uncategorized | Comments Off
Posted on August 17, 2006 by manura
आज तलाठी मुळशी यांनी आपली कारवाई पुर्ण केली आणि सरकार-दरबारी, सात-बारा, इ. सर्व ठिकाणी वनराई चे मालक म्हणुन आमचे नाव लागले. पहिला गड सर झाला. सर्व कागदपत्र आमच्या हाती आले. आज १७ ऑगस्टला एका लेकीच्या वाढदिवशी दुस-या लेकीचे ‘बर्थ सर्टीफिकेट’ आलं हा एक छोटासा योगायोग.

Filed under: darabari | Leave a Comment »
Posted on August 10, 2006 by manura
वनराई आणि आसपासच्या परिसराचे वर्णन ह्या एका विशेषणाने करता येईल रुद्रसुंदर. पाउस नुसता कोसळतो आहे. चार तासात १६४ मिली पाउस नोंद म्हणजे काय झाले? सगळी सृष्टी जलथल झाली आहे, जमीन, झाडे, हवा सगळे जलमय.

गेल्या शनीवारी आम्ही तिघं गेलो होतो राईवर भिजायला. तिथुन पुढे एक रस्ता वळत वळत जातो वळणे गावाला. तिथे डोंगराच्या अंगाखांद्यावरुन धबधबे उड्या घेत होते. धरणामागे समुद्र लोटला होता. एका ठिकाणी उंचावर कड्यावरुन उड्या घेणारी पाण्याची धार खाली पडायच्या ऐवजी वा-याच्या झोताने वर उडुन जात होती.

वनराईला जाउन बघतो तर, एवढ्या पावसात निम्मं गाव तिथे गुरे चरायला अलेलं. गुरं ८ आणि बरॊबर दोन म्हातारे, दोन सकाळची शाळा उरकुन हुंदडणारी मुलं. आपल्य़ा गुराला हाक मारत डोंगरभर भेटणारा अशोक, बाळु, बाळुची बायको, घरी गप बसायचे सोडुन गुरांमागे टाईमपास करत होती. राईच्या शेजारी एक घळ आहे, त्यातुन पाण्याचा दोदाणा वहात होता. बाळु म्हणाला चला तुम्हाला मस्त प्वाइंट दावतो. मग तो माकडावाणी झपाझप पुढे आणि आम्ही टरकत मागे असे निघालो. धबाधबा वाहणारं पाणी, निसरडे दगड, आणि पिकनिकला आलेल्या गोगलगाई. एक ओला चिंब अनुभव!

Filed under: visits | Leave a Comment »
Posted on July 24, 2006 by manura
मोजणीच्या कामाला मग अजुन पिल्लं फुटली आणि सगळे काम व्हायला एक महिना लागला, अंदाज होता त्या पेक्षा थोडा जास्त परिसर आहे.
सात बाराच्या उता-यावर शेतक-याच्या सह्या झाल्या पण तो अजुन आमच्या नावावर चढला नाही.
Filed under: darabari | Leave a Comment »